ट्रेंडिंगमनोरंजनराजकारण

संदीप सिंहचा भाजपशी काय संबंध?, 177 कोटींच्या करारावरून सचिन सावंत यांनी पुन्हा केलं लक्ष्य

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणात चौकशीच्या फेऱ्यात अडकलेला त्याचा मित्र संदीप सिंह याचे भाजपशी संबंध असल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआय चौकशीत अमली पदार्थांचा नवा अँगल समोर आला आहे. सुशांत अमली पदार्थाचं सेवन करत असल्याचा संशय आहे. याप्रकरणी बॉलिवूडमधील ड्रग्ज रॅकेटच्या संदर्भात सीबीआय संदीप सिंहची चौकशी करणार आहे. संदीप सिंहच्या मुद्द्यावरून काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल करत आहे. संदीपचे भाजपशी कनेक्शन असल्याचा दावा केला जात आहे.

‘भाजपच्या मर्जीतील मुलगा संदीप सिंह यांच्या कंपनीचे आर्थिक व्यवहारात 2017 साली 66 लाखाचे नुकसान झाले होते, 2018 साली साली 61 लाखाचा नफा, तर पुन्हा 2019 मध्ये 4 लाखाचे नुकसान झाले होते. 2019 मध्ये गुजरात सीएम रूपानी यांनी संदीप सिंहसह 177 कोटींचा करार केला. हा पैसा कुठून येत होता?’, असे ट्वीट सचिन सावंत यांनी केले आहे.

 

त्याला लागूनच सावंत यांनी दुसरे ट्वीट केले आहे. ज्यामध्ये त्यांनी असे म्हटले आहे की, ‘मोदीजींचा बायोपिक करण्यास सहमती दर्शविण्याकरिता हा सामंजस्य करार होता? हे “टोकन अ‍ॅडव्हान्स” होते का? गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी संदीप सिंह याची निवड नेमक्या कोणत्या कारणासाठी केली?’ अशाप्रकारे सचिन सावंत यांनी प्रश्नांची सरबत्ती करत भाजप नेत्यांना घेरण्याचा प्रयत्न केला आहे.

 

शनिवारी देखील सचिन सावंत यांनी काही ट्वीट्स करत संदीप सिंह, महाराष्ट्र भाजप आणि गुजरात भाजपवर टीका केली होती. लंडनमध्ये पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या संदीप सिंह याने महाराष्ट्र भाजपच्या कार्यालयात 53 वेळा फोन केले होते, असा दावा काँग्रेसनं केला आहे. महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतचा त्यांचा फोटो ट्वीट केला होता. संदीप सिंह हा बॉलिवूडमधील एक निर्माता असून त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर चित्रपट बनवला होता. त्यामुळं भाजपशी असलेल्या त्याच्या संबंधांची चौकशी व्हावी, अशी मागणी सावंत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली होती.

Comment here