ट्रेंडिंगमनोरंजन

सुशांत प्रकरणातील सर्वात मोठी घडामोड; रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविकला अटक

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दिवसेंदिवस नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहे. सीबीआय सुशांतच्या मृत्यूचा तपास करत असतानाच या प्रकरणात आता ड्रग्ज कनेक्शनही समोर आलं आहे. शुक्रवारी, 4 सप्टेंबरला एनसीबीने रिया चक्रवर्ती आणि सॅम्युअल मिरांडाच्या घरी धाड टाकली आहे. एनसीबीने अभिनेत्री रिया चक्रवर्तीचा भाऊ शौविक चक्रवर्तीला अटक केली आहे. त्याचबरोबर सुशांतचा मॅनेजर सॅम्यूअल मिरांडा यालादेखील एनसीबीकडून अटक करण्यात आली आहे.

याप्रकरणी आत्तापर्यंत 7 लोकांना अटक करण्यात आली आहे. याआधी एनसीबीने अब्बास, करण, जैद, बासित आणि कैजान यांनाही अटक केली आहे. यापैकी अब्बास आणि करण यांना जामीन मिळाला आहे.

शुक्रवारी सहाच्या दरम्यान एनसीबीच्या पथकानं शौविक आणि सॅम्युअलच्या घरावर छापा टाकला होता. तिथून दोघांनाही एनसीबी कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आलं होतं. अखेर अनेक तासांच्या चौकशीनंतर एनसीबीनं शौविकला अटक केली आहे. तर, सॅम्युअल मिरांडालाही अटक करण्यात आलं. त्याचबरोबर एनसीबी रियालाही समन्स बजावण्याची शक्यता आहे.

शुक्रवारी एनसीबीने रिया चक्रवर्तीचा भाऊ शोविक चक्रवर्तीला आणि सॅम्युअल मिरांडला चौकशीसाठी बोलावलं होतं. चौकशीमध्ये सॅम्युअल मिरांडाने सुशांतसाठी ड्रग्ज घेत असल्याचं कबूल केलं, असं एनसीबीने सांगितलं आहे. एनसीबीने चौकशीनंतर शोविक आणि सॅम्युअलला अटक केली.

एनसीबीने याप्रकरणी आत्तापर्यंत 59 ग्रॅम गांजा जप्त केला आहे. अब्बास रमजान लखानीकडून 46 ग्रॅम आणि करण अरोराकडून 13 ग्रॅम गांजा मिळाला आहे. याप्रकरणात इलेक्ट्रॉनिक सबूत जास्त असले तरी गांजाचं प्रमाण फक्त 59 ग्रॅम आहे, असं तज्ज्ञांकडून सांगण्यात येतंय. ड्रग्जचे पैसे देण्यासाठी गुगल पे वापरण्यात येतं होतं, अशीही माहिती तपासात समोर आली आहे.

रियाचा भाऊ शोविक आणि रियाचा खास माणूस सॅम्युल मिरांडा यांच्या अटकेमुळे आता रियाच्या अटकेची ही दाट शक्यता निर्माण झाली आहे. कारण शोविक आणि रिया यांच्यातदेखील अंमली पदार्थ खरेदी विक्री बाबतीत चॅटिंग झाले असून रियाचे संशयित अंमली पदार्थ तस्कर गौरव आर्या याच्यासोबतची चॅट समोर आली आहेत. या चॅटवरूनच हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. यात रियाला मुख्य आरोपी दाखवण्यात आल आहे. त्यामुळे रियाच्या अटकेचीही दाट शक्यता निर्माण झाली आहे

Comment here