कलाकारमनोरंजन

नाना पाटेकरांनी दिला सुशांतच्या कुटुंबीयांना भावनिक आधार

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस कसून चौकशी करत आहेत. चौकशीदरम्यान सुशांतच्या आत्महत्येबाबत अनेक नवनविन खुलासे होत आहेत. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड कलाकार ते राजकीय नेतेमंडळी त्याच्या पाटणाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन करत आहेत. यातच नाना पाटेकर यांनीही सुशांतच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबाला भावनिक आधार दिला.

नाना पाटेकर हे सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटरला लष्कराच्या जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान, त्यांनी वेळ काढून सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांची भेट घेतली.

सुशांतच्या वडिलांना, त्याच्या कुटुंबीयांना धीर दिला. सुशांत एक अतिशय चांगला आणि उत्तम अभिनय सादर करणारा अभिनेता होता. तो आता या जगात नाही, यावर आपला विश्वासच नसल्याची भावना नानांनी व्यक्त केली. सुशांत आपल्यामध्ये नसल्याचं दु:ख आपण अद्यापही पचवू शकलो नसून, मी माझाच मुलगा गमावल्यासारखं वाटत आहे, असंही नानांही म्हटलं. सुशांतसारखी मुलं फार कमी असतात. तो फारच लहान होता. यापुढंही तोआणखी ३० वर्षे काम करु शकत होता या शब्दांत त्यांनी त्याच्या नसण्याची भावना व्यक्त केली.

नानांनी सुशांतच्या घरच्यांसोबत संवाद साधत त्यांना थोड्या प्रमाणात धीर दिला. मुलाच्या जाण्यानं गळून गेलेल्या त्या बापाला दोन शब्द बोलून या बिकट परिस्थितीत भावनिक आधार देण्याचं काम नानांनी केलं. मात्र त्याचं सांत्वन करता करता ते स्वतःही भावूक झाले.

 

बॉलिवूड क्षेत्रातील मनोज तिवारी, पवन सिंह, खेसारीलाल यादव, राकेश मिश्रा, गायक-अभिनेता अक्षरा सिंह या दिग्गज अभिनेत्यांनीही सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेतली होती. त्याचबरोबर तेजस्वी यादव आणि तेज प्रताप यादव हे देखील सुशांतच्या घरी पोहोचले. भाजप नेते सुशील कुमार मोदी यांनी देखील सुशांतच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचं सांत्वन केलं होतं. काही दिवसांपूर्वी सुशांतची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेही घरी कुटुंबियांची भेट घेण्यास पोहोचली होती.

बाॅलिवूड विश्वात अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर एकच खळबळ उडाली असून सध्या बॉलीवूडमध्ये घराणेशाहीवरुन आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. तसेच पोलिसांकडून बॉलिवूडमधील अनेक दिग्गजांची सुशांतच्या आत्महत्येचे कारण शोधण्यासाठी चौकशीही केली जात आहे.

Comment here