मनोरंजन

मराठी प्रेक्षकांनाच मराठी चित्रपट पाहायचे नाहीत – महेश मांजरेकर

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगात थैमान घातलं आहे. त्यामुळे मनोरंजनसृष्टी ठप्प पडली होती. मात्र आता हळूहळू शुटिंग चालू होत आहे. कोरोना काळात मनोरंजन क्षेत्राचे भरपूर नुकसान झाले आहे. काही कलाकार बेरोजगार झाले आहेत. चित्रपटांचे शुटिंग लांबणीवर गेले आहेत. यातच महेश मांजरेकर यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

प्रतिकूल परिस्थितीत मराठी मनोरंजनसृष्टी कुठे उभी आहे? यावर चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. मराठी प्रेक्षकांनाच आपले चित्रपट पाहायचे नाहीत, त्यामुळे मराठी चित्रपटसृष्टी आर्थिक कोंडीत सापडल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर म्हणाले , ‘कोरोना आणि लॉकडाउनमुळे मराठी सिनेसृष्टीची आर्थिक स्थिती फारच बिकट झाली आहे. सध्या आपल्याकडे वेट अँड वॉचचाच पर्याय उपलब्ध आहे. सिनेमागृह सुरु होतील, प्रेक्षक येऊन चित्रपट पाहतील. आणि परिस्थिती सुधारेल अशीच अपेक्षा आपण करु शकतो. आपली स्पर्धा हिंदी सिनेसृष्टीशी आहे. पण या स्पर्धेत आपण मागे पडत चाललो आहोत. कारण मराठी प्रेक्षकच आपल्या चित्रपटांना प्रतिसाद देत नाहीत’. असे त्यांनी सांगितले.

पुढे ते म्हणाले, ‘आपल्या प्रेक्षकांचा कल मराठी चित्रपटांऐवजी हिंदी पाहण्याकडे अधिक आहे. त्यामुळे या कोरोनाच्या फटक्यातून बॉलिवूड लवकर बाहेर पडेल. पण मराठीचं काही सांगता येत नाही. तसंच आता ओटीटी प्लॅटफॉर्मवर देखील हिंदी चित्रपट आणि मालिकांचीच चलती आहे. त्यात प्रादेशिक भाषांसाठी जी जागा होती ती पाश्चात्य चित्रपटांनी व्यापून टाकली, त्यामुळे तिथेही मराठी मनोरंजन क्षेत्र काहीसं मागे पडल्याचं दिसत आहे. ही परिस्थिती लॉकडाउन आणि कोरोनामुळे आणखी बिकट होत चाचली आहे.” अशा भावना महेश मांजरेकर यांनी व्यक्त केल्या.

Comment here