मनोरंजन

महेश भट्ट यांच्या भावानं अभिनेत्रीवर दाखल केला अब्रुनुकसानीचा दावा

दिग्दर्शक महेश भट्ट यांचे बंधू मुकेश भट यांनी अभिनेत्री लुविना लोध विरोधात उच्च न्यायालयात मानहानीचा दावा दाखल केला. भट बंधूंवर खोटे आरोप केल्याचा त्यांचा दावा आहे. अंमली पदार्थांच्या प्रकरणात खोटे आरोप करून बदनामी केल्याप्रकरणी चित्रपट दिग्दर्शक निर्माते महेश भट्ट आणि मुकेश भट्ट यांनी तिच्याविरोधात उच्च न्यायालयात धाव घेत एक कोटी रुपयांचा अब्रू नुकसानीचा दावा केला आहे. महेश भट्ट आणि त्यांचे बंधू मुकेश भट्ट यांच्याबद्दल पुढील आदेश येईपर्यंत कोणतेही मानहानिकारक आणि निंदनीय विधान करू नका, असे निर्देश सोमवारी मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेत्री लुविना लोध यांना दिले आहेत.

लुविनाचा नवरा सुमित सभरवाल हा भट्ट यांचा दूरचा पुतण्या आहे. सुमित हा बॉलिवूड वर्तुळातील ड्रग्ज आणि वेश्या व्यवसायात सामील असून तो महेश भट्ट यांच्या सांगण्यावरून हे धंदे करतो त्यामुळे त्यांना या सर्व गोष्टींची माहिती आहे. अशा आशयाचे आरोप या इंटरव्ह्यूमध्ये लुविनाने केले आहेत. तसेच तिने महेश भट्ट यांचा उल्लेख बॉलीवूडमधील ‘डॉन’ असा करत बॉलिवूडमधील ड्रग्ज साखळी चालविणाऱ्या पैकी भट्ट एक असल्याचा गंभीर आरोपही केला आहे.

याविरोधात महेश भट्ट यांचे वकील अमित नाईक यांनी लुविनाला कायदेशीर नोटीस पाठवत असे तथ्यहीन आरोप करू नयेत, असे बजावले. लुविनाला अशी विधाने करण्यापासून थांबवावे व एक कोटी रुपयांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी या दाव्यात केली आहे. तसेच लुविनाला तो वादग्रस्त व्हिडीओ संबंधित समाजमाध्यमावरून काढण्याचे आदेश द्यावेत, अशीही विनंती भट्ट यांनी केली.

न्यायमूर्ती अनिल मेनन यांच्यासमोर या याचिकेवर सोमवारी तातडीची सुनावणी झाली. त्यावेळी लोध हिला उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्या वेळी लोध हिच्याकडून भट्ट बंधुंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केले जाणार नसल्याचे तिच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले. कायदेशीर नोटीस बजावूनही लोध हिने बदनामी न थांबवल्याने भट्ट बंधूंनी शेवटी उच्च न्यायालयात धाव घेत तिच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला.

Comment here