ट्रेंडिंगराजकारण

देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं निधन

माजी राष्ट्रपती आणि काँग्रेसचे संकटमोचक प्रणव मुखर्जी यांचे सोमवारी निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. दिल्लीतील रिसर्च अँड रेफरल रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मागील अनेक दिवसांपासून दिल्लीतील आर्मी हॉस्पीटलमध्ये उपचार सुरू होते. त्यांच्या निधनाची माहिती त्यांचा मुलगा अभिजीत यांनी ट्विट करुन दिली आहे.

प्रणव मुखर्जी यांच्या मेंदूवर काही दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यादरम्यान त्यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे समोर आले होते. तेव्हापासून त्यांची प्रकृती गंभीर होती. व्हेंटिलेटर सपोर्टवर त्यांना ठेवण्यात आले होते. दरम्यान, आज अखेर त्यांचा मृत्यूसोबत सुरू असलेला संघर्ष संपला आणि त्यांची प्राणज्योत मालवली.

गेली सहा दशके राष्ट्रीय राजकारणाच्या केंद्रस्थानी असणाऱ्या प्रणवदांना राष्ट्रीय राजकारणात इंदिरा गांधी यांनी आणले. तब्ब्ल पाच वेळा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत असणारे प्रणवदा अखेरपर्यंत या पदापासून दूर राहिले. त्यांची राष्ट्रपती पदावर निवड करून काँग्रेसने त्यांचा अखेरच्या काळात सन्मान राखला.

प्रणव मुखर्जी यांनी 2012 ते 2017 या काळात देशाचे राष्ट्रपतीपद सांभाळले होते. तत्पूर्वी त्यांनी केंद्र सरकारमध्ये वित्त, संरक्षण, परराष्ट्र यासह विविध महत्त्वपूर्ण पदांवर काम केले होते. तसेच लोकसभा आणि राज्यसभा सदस्य म्हणून त्यांनी दीर्घकाळ प्रतिनिधित्व केले होते. त्याबरोबरच विविध संसदीय समित्यांमध्ये त्यांनी आपल्या कर्तृत्वाची छाप पाडली होती. प्रणव मुखर्जी यांना त्यांच्या योगदानासाठी भारत सरकारने त्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केले होते.

Comment here