खेळमनोरंजन

महेंद्रसिंह धोनीच्या निवृत्तीवर अनुष्का शर्माची पोस्ट, म्हणाली…

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आत्तापर्यंतच्या टीम इंडियाच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक म्हणून धोनीचा लौकिक आहे. त्याचा हेलिकॉप्टर शॉट असो किंवा त्याने अनेकदा हातातून गेली अशी वाटणारी जिंकलेली मॅच असो धोनीचा खेळ क्रिकेटरसिक कधीही विसरणार नाहीत. कलाकारांनी देखील कॅप्टन कूल धोनीला सोशल मीडिया माध्यमातून भावनिक निरोप दिला आहे. यातच अभिनेत्री अनुष्का शर्मानंही पोस्ट शेअर करत आपली भावना व्यक्त केली.

“कधीही न विसरता येणाऱ्या आठवणी दिल्यामुळे मनापासून धन्यवाद एम.एस. धोनी”, अशी पोस्ट अनुष्काने शेअर केली आहे. सोबतच तिने धोनीचा एक फोटोदेखील शेअर केला आहे, अनुष्काप्रमाणेच कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत धोनीविषयी असलेला आदर आणि प्रेम व्यक्त केलं आहे.

 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून त्यानं निवृत्ती घेतली असली तरी तो आयपीएल सामन्यांमध्ये मात्र दिसणार आहे. ३९ वर्षीय धोनीनं यापूर्वीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. महेंद्रसिंह धोनीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे आपल्या निवृत्तीची घोषणा केली. “सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल धन्यवाद. आज संध्याकाळी ७.२९ पासून मला निवृत्त समजलं जावं,” असं त्यानं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. त्या पोस्टसोबतच धोनीनं एक व्हिडीओही शेअर केला आहे.

धोनीच्या निवृत्तीनंतर क्रिकेट जगतातूनही त्याच्या खेळीचं आणि कारकिर्दीचं कौतुक करण्यात येतंय. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, वन डे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या तीनही स्पर्धा जिंकणारा तो जगातला एकमेव कर्णधार आहे. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. 50+च्या सरासरीनं वन डे क्रिकेटमध्ये 10 हजार धावा करणारा खेळाडू, वन डेत सर्वाधिक नाबाद राहणारा खेळाडू, यष्टिरक्षक म्हणून वन डेत सर्वोत्तम वैयक्तिक खेळी, वन डेत सर्वाधिक यष्टिचीत, ट्वेंटी-20 तर शुन्यावर बाद न होता सर्वाधिक काळ खेळणारा फलंदाज, कर्णधार म्हणून सर्वाधिक वन डे सामने खेळणारा, आदी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत.

Comment here